हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

. पुराना मंदीर और पुरानी यादे ( बालपणीच्या आठवणी )

काल हेलोवीन होता. अमेरिकेत तर निसर्ग चेटकीण , भुतांच्या स्वरुपात प्रत्येक अमेरिकावासियांच्या दारावर उभे ठाकले आहे.
जर्मनीत ह्या सणाचे विशेष महात्म्य नाही. पण माझे मन मला माझ्या बालपणीच्या आठवणी मध्ये रमले.
भुतांच्या गोष्टी आजी , आजोबा ह्यांच्या कडून ऐकल्या गेल्या. माझा पिंड
भुतांच्या गोष्टीवर बालपणी पोसल्या गेला.

आमच्या सोसायटी मध्ये गच्चीवर भाड्याने विडीयो आणून ३ सिनेमे सलग पाहण्याची परंपरा कोजागिरीच्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सुरु झाली. येथेच मी गुमनाम , बीस साल बाद ( जुना ) आणि वो कौन थी सारखे सिनेमे पहिले.

आजही ते सिनेमे पाहतांना मधूनच एखाद्याला बाथरूम ला जावयाचे असेल तर एकट्याने गच्ची ते घर हे अंतर कापतांना होणारी जीवाची धडधड अजूनही जाणवते.

भारतात वी सी आर घराघरांमध्ये पोहोचले. व व पूर्वी इंग्रजी सिनेमा ही मुठभर उच्चवर्गीय  मक्तेदारी मोडत मध्यमवर्गीयांच्या घरी पोहोचला.
व ८० च्या दशकात हॉलीवूड च्या हॉरर जगतातील बेताज बादशहा .
मायकल मायर . जेसन , किंवा फ्रेडी हे भारतात सुद्धा लोकप्रिय झाले.
हॉरर सिनेमांचा थरार भारतीय प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवू लागला.
मात्र बॉलीवूड त्या काळात एकूणच  संक्रमणावस्थेतून जात होता.

इंदिरा इज इंडिया च्या धर्तीवर अमिताभ इज बॉलीवूड असा प्रकार होता.
मात्र तो राजकारणात गेल्याने बॉलीवूड मध्ये एक रिक्त पोकळी निर्माण झाली होती.
ती भरून काढण्याचे काम गरिबांचा अमिताभ मिथुन व इतर अभिनय करण्याचा अभिनय करणारे अभिनेते करत होते.
ह्याच वेळी रामसे बंधूंच्या डोक्यात त्यांच्या प्रत्येक सिनेमात कोसळते तशी विजेसारखी एक कल्पना चमकली.
भारतीय प्रेक्षकांना त्यांचा मातीतला त्यांना भावेल असा फ्रेडी , जेसन ह्यांचा भारतीय अवतार जन्माला घालायचा.
आणि सामरी ह्या   पहिला वाहिला भारतीय राक्षस , दैत्य  , महाभूताचे व्यक्तिचित्र हळूहळू आकारास येऊ लागले.
ह्या आधी भयपट किंवा भूतपट काढण्याचे प्रयत्न ह्या रामसे बंधूंकडून झाले होते,
पण त्यांना यश मिळाले नव्हते कारण मुळात भारतीय साहित्यात आणि सिनेमांच्या मध्ये भय कथांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळायची.
भारतीय साहित्य व सिनेमा मधील मुख्य प्रवाहातून अश्या सिनेमांची निर्मिती झाली नव्हती व अश्या सिनेमांना हक्काचा प्रेक्षकवर्ग नव्हता. म्हणून सुरवातीला शून्यापासून सुरुवात करणाऱ्या रामसे बंधूंना प्रेक्षकांची नाडी ओळखण्यासाठी १९८4 साल उजाडावे लागले.
ह्या आधी बीस साल बाद ते कोहरा हे परकीय कांदबरी व सिनेमावर आधारीत सिनेमे
भारतात त्यांचा अवीट संगीतामुळे लोकप्रिय झाले होते, पण ते रहस्य गटात मोडायचे. म्हणजे सोफ्टकोर भयपट. मात्र हॉलीवूड सारखे हार्ड कोर भयपट काढण्याची मनीषा ह्या
बंधूनी धरली व त्यातून साकार झाला पुराना मंदीर

१९८4 सालचा सर्वात लोकप्रिय सिनेमा ( खोटे वाटते तर आंजा वर गुगलून पहा.)
रामसे बंधूंनी कुठल्याही परकीय कथानकाचा आधार न घेता भारतातील गावांमध्ये प्रचलित असलेल्या भूता खेतांच्या गोष्टी विशेषतः
उत्तर भारत , राजस्थान व हिमाचल प्रदेश येथील पहाडी भाग येथे चुडेल , हडळ किंवा भुतांच्या गोष्टी त्यांच्याविषयी दंतकथा वर्षोवर्ष प्रचलित आहेत. त्यावरून घेतले आहे.


( आपल्याकडे हा मान कोकणाकडे जातो. त्यातही चकवा लागणे हा प्रकार तर अस्सल मराठी मातीतील आहे.
ह्या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मोहनीश बेहेल ह्याचा हा पहिला सिनेमा
ह्या सिनेमात पुढे प्रसिद्ध पावलेले कलाकार , मोहनीश बेहेल , सदाशिव अमरावपुरकर , सतीश शहा , आशालता , पुनीत इस्सार , प्रदीप कुमार , जगदीश ,
तर संगीतात
आशा भोसले ,महेंद्र कपूर अश्या पहिल्या फळीतील गायक ह्या चित्रपटाला लाभले.
संगीतकार अजित सिंग ह्यांनी जरी पुढे बॉलीवूड मध्ये विशेष कर्तुत्व दाखवले नाही तरी ह्या सिनेमाचे संगीत आणि सिनेमातील प्रमुख गाणे वो बीते दिन जीव तोडून गायले आहे
जे त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले. पुढे त्यांचे रिमिक्स सुद्धा निघाले .
सिनेमाची कथेतील पात्र , घटना ह्या आपण लहानपणी वाचत , ऐकत असलेल्या दंतकथेवर आधारीत आहेत.
थोडक्यात  कथा अशी

एका राज घराण्यावर २०० वर्षापासून एका ह्या  दैत्याचा शाप असतो.
 ह्या घराण्यातील मुलगी तिच्या पहिल्या बाळंत पणात
ह्या शापामुळे मृत्युमुखी पडत असते.
हा शाप नेमका का व कोणामुळे पडला ह्याचे उत्तर सामरी असे असते

सामरी म्हणजे सात फुटी नरभक्षक खुनी दरिंदा , शैतानी व तांत्रिक विद्येचा पुजारी
व ही विद्या मिळवून वाढवण्यासाठी त्याने नव वधुंचा लग्नाच्या वेदीवरून अपहरण करून त्यांचा बलात्कार करून खून करणे , लहान मुलांना मारून त्यांचे रक्त पिणे
व स्मशानातील प्रेते उकरून खाणे अशी दुष्कृत्य केली असतात.

ही भूमिका अजय अग्रवाल ह्या गुणी कलाकाराने एवढी जिवंत केली.
त्याच्या सात फुटी देहाचा व पाशवी वाटणाऱ्या चेहऱ्याचा ह्या व्यक्तिरेखेसाठी चपखल वापर करून घेतला.
व भारतीय जनतेला पहिला वाहिला अस्सल भारतीय भूत , क्रूरकर्मा लाभला.
त्यांच्या दर्शनाने गर्भ गळीत झालेले प्रेक्षक मी स्वतः थेटरात पहिले आहेत.
ह्या सिनेमाच्या अनुषंगाने सांगावेसे वाटते की साधारण १० वर्षापूर्वी सामना वृत्तपत्रात बातमी वाचली की पुराना मंदीर इन काऊनतर  मध्ये मारला गेला.
पूर्ण बातमी अशी होती.
अजय अग्रवाल हा दाउद टोळीत सामील झाला होता व तो नामचीन शार्प शुटर व खंडणी बहादूर म्हणून नावारूपास आला होता. त्याच्या प्रसिद्ध सिनेमा पुराना मंदिर मुळे
अंडरवर्ल्ड  मध्ये त्याचे नाव पुराना मंदीर पडले होते.
अजय अग्रवाल चे शेवटचे दर्शन मेला सिनेमात दिसले होते. त्यात खालावलेल्या प्रकृतीचा अजय पाहवलं गेला नाहि. त्याचा अंत  पडद्यावर होतांना अनेकदा पहिला होता. मात्र वास्तविक आयुष्यात असा अंत होणे दुर्दैवी होते.

तर कथा पुढे सरकत असतांना शहरात ह्या घराण्याचा वारस प्रदीप कुमार आपली मुलगी सुमन कथेतील नायिका ( आरती गुप्ता ) सह राहत असतो. ती जेव्हा मोहनीश च्या प्रेमात पडून लग्न करणार असते. ह्या शापामुळे तिच्या वडिलांचा तिच्या लग्नाला विरोध असतो. मात्र सत्य कळल्यावर ही सर्व भाकड कथा मानून तिला चुकीची सिद्ध करण्यासाठी सुमन व मोहनीश त्यांचा मित्र पुनीत इस्सार व त्याच्या बायको सह
बिजा पूर कडे कूच करतात.
तेथे एकेकाळी तिचे पूर्वज राज्य करत असतात. तेथे त्यांच्या सध्या ओसाड  पडलेल्या शाही राजेशाही राज हवेलीत ते दाखल होतात.
तेथून ह्या राज हवेली व विजापूरच्या सरहद्दीवरील शिव मंदीर जे आता पुराने झाल्यामुळे
ओसाड पडले असते ह्यांच्यातील संबंध शोधायला लागतात.

हवेलीची रखवाली सदाशिव अमरावपुरकर करत असतो. त्याचा मित्र सतीश शहा त्याच्या डोक्यात शहरातून ही मंडळी खजिना शोधण्यासाठी आले आहेत असा गैर समज करून घेतात.
आणि ह्याच गैरसमजुतीतून पुढे अनर्थ घडतो.त्याबाबत अधिक खुलासा करण्यापेक्षा ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे सोयीस्कर आहे
.
ह्या सिनेमाच्या निमित्ताने रामसे बंधूंनी अनेक प्रयोग केले.
ह्या सिनेमातील पाश्र्व संगीत खूपच गाजले व सिनेमात ते अंगावर येथे. तेच पुढे त्यांच्या पुढील काही सिनेमांमध्ये व नव्याने सुरु झालेल्या झी टीव्ही वरील झी हॉरर शो चा टायटल ट्रेक बनले.  ७० च्या दशकात हॉलिवूड मध्ये ओमान मध्ये जेरी गोल्ड स्मिथ ने सिनेमात वापरलेले भयप्रद संगीताने सिनेमात प्रचंड वातावरण निर्मिती केली होती. हाच पैलू रामसे बंधूंनी आपल्या सिनेमात खुबीने वापरला. ह्यामुळे सिनेमात सामरी च्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या प्रेक्षकांना दर्शन होत राहिले व त्याने योग्य ती वातावरण निर्मिती साधली गेली. प्रस्तुत संगीत हे ओरीजिनल होते.. हे उचलेगिरी सर्रास करणाऱ्या बॉलिवूड साठी नवीन होते.

८० च्या दशकात भारतीय दर्शक आजच्या इतके सहजतेने हॉलिवूड सिनेमा पाहू शकत नसत, परकीय टीव्ही वाहिन्या अजून सुरु झाल्या नव्हत्या, व्हिडीयो त्या काळात क्वचित प्रसंगी भाड्याने आणून पाहण्याची प्रथा होती. अश्या काळात भय , हिंसा , तणाव ह्यांचा त्रिवेणी संगम भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन व थरारक अनुभव होता. म्हणून तो आवडल्या गेला
. जगातील कोणत्याही हॉरर सिनेमात आढळणारे अनेक घटक ह्याही सिनेमात होते. बेबंद तरुणाई , समाजातील नियम झुकवून , दुनियेची दुनियेची पर्वा न करता आपले नियम स्वतः बनवणारी बिनधास्त व बेधडक हॉरर सिनेमाचे प्रमुख अंग म्हणजे अंग प्रदर्शन पण त्या काळात सेन्ससोर च्या सोवळे पणाचा मान राखत आजपर्यंत भारतीय प्रेक्षकांनी पडद्यावर न अनुभवलेला स्कीन शो मोठ्या  कल्पकतेने  कुठेही अश्लील न वाटू देता रामसे बंधूंनी सिनेमात दाखवला. ( निदान पुराना मंदीर मध्ये तरी ह्या पुढील सिनेमात मात्र .....


ह्या सिनेमातील बहुतेक चित्रीकरण जरी मुंबई मधील स्टुडियो मध्ये झाले असले तरी
ह्यातील प्रसिद्ध हवेली म्हणजे कोकणातील  मुरुड येथील नवाब महल

एका बाजूला समुद्र व दुसर्या बाजूला ही प्रशस्त हवेली   १८८५ साली मुघल आणि गोथिक शैलीत बनलेली  डोळ्याचे पारणे फेडते पण सिनेमात महत्वाची भूमिका पार पाडतो. (  मुरुड च्या सिद्दी च्या राजघराण्यातील व्यक्तीचे निवास्थान व सध्याचे पर्यटन स्थळ )
 आताच्या जमान्यात ते आपल्या दृष्टीने अगदीच पाणीकम वाटेल. पण वय वर्ष १० ते १५ वर्षात आमच्यासाठी दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रकार होता. सिनेमात दोन ते ३ भयानक प्रसंगातून प्रेक्षकांना माफक हास्य विनोद दाखवून त्याचा ताण दूरू करण्याची अभिनव कल्पना रामसे बंधूनी ह्याच सिनेमातून अंमलात आणली.

 जग दीप ला मच्छर सिंग दाखवून शोलेची पेरोडी दाखविण्यात आली जिचा मूळ कथेत चपखल पणे वापर करण्यात आला. व त्यावेळी प्रेक्षकांनी ती डोक्यावर उचलून धरली. आजकालच्या अनेक हास्य , विनोदी रीएलीती शो किंवा स्टेड अप कॉमेडी मध्ये शोले ची किंवा त्यातील व्यक्तिरेखेची पेरोडी होते. पण जगदीप ने साकारलेली ही पेरोडी ज्यात ठाकूर राजेंद्र नाथ व बसंती ललिता पवार ह्यांनी धमाल उडवून दिली होती.

पण भयकथांचा हा फोर्मुला त्यांना गवसल्यामुळे पुढे एक दशक त्यांनी ह्याच धाटणीचे सिनेमे बनविले. ह्यात वीराना  ला प्रचंड लोकप्रियता मिळाली ( १९८८) मात्र मग प्रेक्षक तेच तेच पाहून कंटाळले कारण कथा व सिनेमे खूपच प्रेडीक्तटेबल होत गेल्या.
काही मुख्य प्रवाहातील प्रेक्षक त्यांच्या सिनेमांची खिल्ली उडवायला लागले.
मात्र ह्यात नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे.

हा सिनेमा त्या काळातील एक यशस्वी सिनेमा ठरला तरी त्याने हॉरर सिनेमांचा ट्रेंड आणला नाही.

पहिल्या फळीतील नायक , नायिका व सिने शेत्रातील निर्माते व दिग्दर्शक ह्या प्रकरणापासून चार हात दूरच राहिले.
त्यामुळे अश्या सिनेमांना मर्यादित पण हुकमी प्रेक्षकवर्ग लाभून सुद्धा
त्यांची निर्मिती बॉलीवूड मध्ये इतर कुणी केली नाही.
अपवाद , वो फिर आयेगी ( फराह, राजेश खन्ना, जावेद जाफरी )
ह्यामुळे कमी बजेट मध्ये रामसे बंधू त्यांच्या निवडक कलाकारांना घेऊन  पुढील एक तप
अश्या सिनेमांची निर्मिती करत राहिले.

८५ ते ९० काळ मुळात बॉलीवूड साठी सगळ्यात भिकार होता.
गोविंदा , चंकी , मिथुन आणि सरत शेवटी अमिताभ ( गंगा ,जमुना ,सरस्वती , आज का अर्जुन ) भंगार सिनेमातून दर्शन देत होता. अधून मधून धर्मेंद्र , जितेंद्र असे थेरडे सुद्धा शिनेमा शिनेमा खेळत होते. संगीतावर अन्नू ,आणि बप्पी असे अही माही दैत्य राज्य करत होते ( ह्यांच्या पेक्षा आमचा सामरी कैकपटीने कमी भीतिदायक व उपद्रवी होता.) एकूणच सिनेमूल्य कमालीचे खालावले होते. व बॉलीवूड ची सूत्रे
दुबईतून हलवली जात होती.  अश्यावेळी आहे त्या परिस्थितीत आपल्या चाहत्यांना रामसे बंधू
लोकांना घाबरवणे हे घरचे कार्य समजून हॉरर सिनेमे काढत होते.


आज जर यश चोप्रा ह्यांना किंग्स ऑफ रोमान्स म्हटले जाते तसे किंग्स ऑफ हॉरर
हा मान निखालस पणे रामसे बंधूंकडे जातो. इंग्लंड मध्ये १९३४ पासून १९७५ पर्यंत
हेमर फिल्म प्रोडक्शन ने  हॉरर सिनेमांची मुहूर्तमेढ सार्या जगभर  रोवली ह्यात जगप्रसिद्ध सिनेमा  ड्रायकुला (1958  )  चा समावेश आहे.


शाम रामसे ह्यांनी हा सिनेमा त्यांच्या लहानपणी पहिला व ठरविले की सिनेमा बनवायचा तर हॉरर  आणि वडिलांच्या सिने कंपनीत त्यांनी सिनेमा बनवायला सुरवात केली ७० च्या दशकात. आणि  दुर्दैवी योगायोग म्हणजे ह्याच काळात हेमर कंपनी ने सिनेमे करणे काही कारणास्तव बंद केले. व त्याचे हे हॉरर कार्य पुढे रामसे बंधूंनी चालू ठेवले.असत्य , अभद्र ,अशुभ ,अमंगल शक्तींच्या विरुद्ध विजय मिळाल्याच्या सन्मानार्थ आपल्या हिंदू धर्मात सण साजरे होतात. अंतिम विजय सत्याचा व दैवी शक्तीचा होतो. हेच रामसे बंधूंच्या हॉरर सिनेमांचे सार असायचे. हॉलिवूड मध्ये जर ड्रॅक्युला क्रॉस ला घाबरत असेल तर रामसे बंधूंनी भारतीय दैत्य हिंदू धर्मातील सर्वात पवित्र प्रतीक ओम , त्रिशूल ह्या चिन्हांचा खुबीने वापर केला आहे.

 आजही ३० ते ४० च्या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस पुराना मंदीर किंवा रामसे बंधू ही नावे माहीत आहेत. त्यांचा समानार्थी शब्द हॉरर सिनेमा असा होतो.

 आजही भारतातील अनेक बुद्धी जीवी ह्या प्रकारच्या सिनेमांना नाक मुरडतात, त्याच्यातील हजारो दोष शोधून काढतात. जेथे हीच कोक ला हॉलीवूड मध्ये कधीही ऑस्कर मिळाले नाही तेथे अश्या सिनेमांना भारतात मुख्य प्रवाहात कधीच सामील होता आले नाही. पण आजही सर्व पूर्वग्रह बाजूला सारून यु ट्यूब वरील पुराना मंदीर एकदा पहाच. राझ हा आधुनिक हॉरर सिनेमातील एक टप्पा मानला गेला ( जरी तो हॉलिवूड च्या सिनेमाची नक्कल होता ) तर ह्या युगाची सुरुवात म्हणून अस्सल भारतीय बाजाचा पुराना मंदीर एकदा तरी पहाच . घाबरण्याची सुद्धा काय मजा असते


1 टिप्पणी :


 1. रामसे म्हणजे कोणी सत्यजित रे च्या श्रेणीतील सिनेनिर्माते नव्हते. मात्र माझी बालपणीच्या भाव विश्वातील एक कप्पा त्यांनी व्यापला आहे. त्यांनी एक वेगळी भूतांची दुनिया निर्माण केली ह्यातील नियम , सूत्र ही त्याच्या कल्पकतेचा एक भाग होता. त्यांना मुख्य प्रवाहातून मान्यता मिळाली नाही तरी त्यांचा हुकमी प्रेक्षकवर्ग होता. उत्तर भारत व राजस्थान आणि छोट्या गावात किंवा शहरातील सिंगल थेटरात त्यांना चांगला प्रतिसाद मिळायचा. व्हिडीयो केसेट सुद्धा चांगली मागणी असायची. बालपणीचे दिवस गेले व उरल्या फक्त आठवणी

  एक एक रुपया वर्गणी जमवून दहा रुपयात व्हिडीयो केसेट आणणे , मग एखाद्याच्या घरी पडदे वगैरे व्यवस्थित करून भर दुपारी खोलीमध्ये काळोख करणे. मग हॉरर सिनेमे पाहणे आणि त्या भीतिदायक दुनियेत हरवून जाणे . त्यातील भीतिदायक क्षणांना घाबरणे ,दचकणे, एखादी गोष्ट पहायची ,अनुभवायची आहे मात्र भीती देखील वाटत आहे. अश्यावेळी
  बोटांच्या फटी मधून पाहणे हा सुवर्णमध्य असायचा.
  बालपणी अंगवळणी पडलेली ही सवय पौगंडावस्थेत गेल्यावर खूपच कामाला आली.
  अनेक गोष्टी पहिल्यांदा करतांना बालमन शहारले तर उमलते तारुण्य मात्र त्या गोष्टी करायला खुणावत होते मग काहीतरी सुवर्ण मध्य काढायचा
  म्हणजे दारू प्यायची का नाही ह्या प्रश्नापुढे
  बियर काही दारू नसते अशी स्वतःची समजूत घालणे. किंवा त्याकाळातील एक प्रचलित समाज बियर मुळे वजन वाढते.
  आणि कितीतरी आठवणी व मयुरपंखी क्षण बालपणीच्या आठवणीमध्ये अजूनही मनाच्या कप्प्यामध्ये जपले आहेत.

  लेखाची सुरुवात करतांना बालपणी सिनेमा पाहतांना शेजारचा मित्र जास्तच तल्लीन होऊन सिनेमा पाहत असेल तर त्याला हळूच मागणे हलवणे अश्या बालपणीच्या अनेक आठवणी ह्या निमित्ताने ताज्या झाल्या , बहुदा त्यांनीच मला हा लेख पूर्ण करण्याची स्फूर्ती दिली.

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips