हिमवर्षाव

Blogger Tricks

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

सौनायन नमः (इन रोम बी रोमन, चलो सौंना)

 अश्या आजीचा गोड निरोप घेतल्यावर अनिता व केट खरेदीसाठी बाहेर पडल्या .अल्बर्ट म्हाणाला मी व माझे काही मित्र सौना बाथ ला जाणार आहोत येशील का ?
मी लगेच हो म्हटले .ह्यावर केट जाताना कानात कुजाबली तुला माहिती आहे का येथे सौना बाथ महिला व पुरुषांचा एकच असतो. व सगळे दिगंबर पंथीय असतात .तिथे .मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखे कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?


मी जरा का कु करत होतो सौनाला जायला.. तेव्हा सासरेबुवा म्हणाले की "आधी कशी युरोपियन सौनाबाथ घेतला नाहीये का? मी व माझे फुटबॉलपटू सहकारी येथे हिवाळ्यात आठवड्यातून एकदा येतो. येथे अर्ध्या तासावर ३ मजली सौना व स्वीमिंग पूल आहे." मी जाण्यास तयार झालो. ह्या सौनाची बांधणी रोमन पद्धतीची होती. मी मनात म्हटले "इन रोम बी रोमन, चलो सौन"
. सौनाबाथ हा आरोग्यासाठी खूप चांगला. स्टीमबाथ त्याचे जुळे भावंडं. एका मोठ्या खोलीत जेथे बसायला व कलंडून घेण्यासाठी लाकडी बाकडे असतात व तापमान फक्त ६०/ ८०/ ९०/ १०० सेल्सिअस असते. जिथे ४५ म्हणजे भारतात आणि आखातात ५० सेल्सिअस म्हणजे कडक उन्हाळा मानला जातो, तिथे कमाल ५ ते किमान १५ मिनिटे उष्ण तापमानात बसायचे. म्हणजे मनोनिग्रह व सहनशीलता हवी. थोडक्यात मुश्कील है पर नामुमकीन बिलकुल नही. गोरे क्रिकेटर भारतीय उपखंडात येण्याआधी स्टीमसौना बाथ मध्ये १ ते १२ तास सराव करतात तेव्हा कुठे चेन्नई किंवा वेस्ट इंडीजला त्यांचा टिकाव लागतो. येथे मला मात्र माझ्या मनाचा सराव आधी करायचा होता.

 युरोपात जिम मध्ये चेन्जिंग रूम मध्ये सगळेच पुरुष नैसर्गिक अवस्थेत बागडत असतात. अर्थात लंडनला सुरूवातीला जरी विचित्र वाटले, तरीपण गोऱ्या मित्रांसोबत त्यांचे नैसर्गिक अवस्थेत अत्यंत नैसर्गिकरीत्या वावरणे पाहून संकोच मनातून निघून गेला. मग त्यात काही विशेष वाटेनासे झाले. येथे मात्र एखाद्या रूमपुरता प्रकार मर्यादित नव्हता तर तीन मजली सौना गृहात किती तरी पुरुष व स्त्रिया दिगंबरावस्थेत फिरत होते. शॉवर घेत होते... नाही म्हणायला फ्रेंच रीवेर्यात न्यूड बिचेस असतात. ते पहिले आहेत. पण प्रत्यक्ष स्वतः फिरायची पाळी येते तेव्हा जरा विचित्र वाटले, पण एव्हाना माझा ताबा माजी फूटबॉल खेळाडूंनी घेतला होता. येथे सौनाचे विविध छोट्या व मोठ्या खोल्या होत्या. छोट्या खोल्या म्हणजे छोटेसे केबिन. ज्यात चार माणसे मावतील इतकी. तर मोठ्या सौना मध्ये २० ते २५ माणसे बसू शकतील इतकी जागा होती... त्याच्या बाजूला दुसऱ्या मजल्यावर १५ माणसे मावतील इतका मोठा गरम पाण्याचा जकुजी होता. ह्या जकुजी मध्ये साध्या स्विमिंगपूलला कडेला जी बीळ असतात, तशी होती. पण त्यातून फेसाळ गरम पाण्याचा फवारा येत होता त्यामुळे बुडबुड्यांची साम्राज्य होते त्या जाकुजीत. अंग चांगले शेकून निघत होते... येथे अर्थातच फोन आत न्यायला परवानगी नव्हती. एकमेकांकडे रोखून न पहायचा अलिखित संकेत होता.

 ४ तासासाठी १२ युरोची दक्षिणा देऊन आम्ही त्या अग्नीकुडांत प्रवेश केला होता. येथे बहुतेक करून विशीच्या वरची व ७०च्या खालची लोक आलेली होती. २०/३०/५०च्या वयाची अनेक जोडपी होती. ह्यात २०शी ची जोडपी ७०८० च्या दशकात बॉलीवूड मध्ये उद्यानात जसा हिरो हिरोइनसोबत बागडत असतो, सौम्य प्रमाणात प्रणय करत असतो तसे सर्वत्र फिरत होते. साठी सत्तरीचे दांपत्या एकमेकाला आधार देत निवांत पणे जाकुजी मध्ये पाण्याचा शेक घेत गप्पा मारत होते. पण ४०चे मात्र दुनिया मे आये हे तो जिना हि पडेगा, असे काहींचे भाव चेहऱ्यावर घेऊन स्टीम घेत बसले होते. बहुधा तारुण्य व वार्ध्यक्याच्या सीमेवर असल्याने किंवा मंदीमुळे ह्यांना आपल्याकडील लोकांसारखा जीवन गाडा ओढण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागत आहे हे त्यांच्या एकंदरीत अविर्भाव रून दिसून येत होते. बाकी महागाई /बेकारी असे ओळखीचे शब्द युरोपातही माझी साथ देत आहेत मंदीच्या काळात सर्वत्र त्यांचा बोलबाला आहे
..
. येथे प्रत्येक खोलीत कोपऱ्यात शेकोटीच्या करतात तेवढ्या आकाराचे कप्पे आहेत. तेथे गरमागरम दगड ठेवले असतात. बाजूला एक लाकडी बादली व लाकडी पळी असते. त्यात निलगिरीचे पाणी असते. २० जण मोठ्या खोलीत जमल्यावर एक स्वयंसेवक येतो व तो निलगिरीचे पाणी पळीने टाकतो. ते टाकताना स्वतःचा परिचय देऊन आता नक्की तो काय करणार ह्यांची कल्पना देतो. आणि... त्याच बरोबर विक्सच्या वेपर सर्वत्र पसरल्या जातात. मग तो मोठ्या टर्किश पंचा दांडपट्टा फिरवावा तसा त्या खोलीत फिरवतो. (तेव्हा मला बाजीप्रभूची आठवण आली ). जेणेकरून तेथे वाफेचा झोत त्या खोलीत झपाट्याने पसरतो. अंगातून पाणी पानशेत फुटाव तसे वाहू लागते. अंगातील मीठ व साखरेची मात्रा भराभर बाहेर जात असल्याने एक लिंबाची / मोसंबी / ग्रेपफ्रुटची फोड भरुन  वाट्या येते. ते जीवनदायी पदार्ध अधाशासारखे खाल्ले जातात. मग खोलीबाहेर एक बेसिन असते त्याच्या नळातून पाण्यापेक्षा बर्फाचा कीस बाहेर पडत असतो. (आत कोण गोळेवाला बर्फ किसत    असेल ह्या कल्पनेने मला थंडगार गोळ्याची नि गोळेवाल्याची खूप आठवण येऊन गेली ). हा बर्फाचा कीस मग सरत शेवटी वाटल जातो . त्याचा सर्वांगावर शिडकाव केल्यानंतर खरी गंमत असते तिसऱ्या मजल्यावर.

 तेथे १ सेल्सिअस चा थंडगार बर्फाळ पाण्याचा टंक होता. बाहेर आल्यावर लगेच हलका शॉवर घेऊन आम्ही त्यात डुबकी मारायला गेलो. त्याचे वर्णन करायचे म्हणजे सर्व स्त्री पुरुष रांगेत उभे होते. एका मागोमाग सर्व जण डुबकी मारून येत होते.. फ्री-जर मध्ये पाण्याचा तांब्या ठेवून काही मिनटात त्याचा बर्फ होण्याआधी तो बाहेर काढावा व ते पाणी डोक्यावरतून ओतल्यास काय वाटेल ह्याची कल्पना करा... आम्ही चक्क त्यात डुबकी मारली. अंग /भावना सर्व त्याक्षणी गोठल्या गेल्या. १००च्या तापमानातून शरीर १ सेल्सिअस मध्ये तब्बल अर्धा मिनिट होते. ह्याने शरीराचे रक्ताभिसरण चांगले होते म्हणे आणि त्याचा त्वचेच्या कांती वर पण परिणाम होतो. युरोपात नक्की आठवत नाहि मात्र पार शून्याखाली गेला कि त्या देशातील लोक समुद्र किनारी येवून बर्फाळ पाण्यात डुबक्या मारतात. हे टीव्हीवर   पहिले होते. मात्र प्रत्यक्ष अनुभवले त्यादिवशी. मग सर्व जण इथे तिथे पांगले. काही जण पुस्तक वाचत बसले. तर काही गप्पा अर्थात काही जणांनी टोवेल अंगावर घेतला होता काही अजिबात नाही... काही म्हातारे तसेच माझ्यासारखे नवखे, ते मात्र इकडे तिकडे ओझरते पाहत होते व कोणाचे आपल्याकडे लक्ष तर नाही ना ह्याची उगाच मनातल्या मनात भीती बाळगून होते.

. काही टर्किश ललना उगाच सर्वांगाला हिंदोळे देत फिरत होत्या. ह्या पोरी येथेच जन्मलेल्या टर्किश लोकांची अनिवासी पिढी होती. पण अजूनही ह्या समाजाची मानसिकता त्यांना जर्मन म्हणून देशाचा मुख्य प्रवाहात त्यांना येऊ देत नाही . उगाच येथे सर्वत्र गोर्यांचे राज्य होते. मला, अर्थात कुठेही बसताना गुप्तांग शक्यतो टोवेल ने झाकून बसत होते. अर्धी लोक रूम शिवाय बाहेर हिंडताना टोवेल वर व बाथ सूट घालून सासऱ्याच्या  मात्र म्हाताऱ्यांना ग्रुप मात्र वस्त्राची अजिबात तमा बाळगत नव्हता... आम्ही मात्र खेळाडूचा ग्रुप असल्याने बर्थडे सूट वर होतो. ह्या म्हाताऱ्यांना आयुष्यभर खेळाशीफिटनेसशी लगीन लागल्याने काया / प्रकृती / चर्या व वृत्ती अत्यंत उमदं होती. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खेळकर असतो. तेवढ्यात शेजारच्या गावातील माझ्या सासऱ्याच्या दोन मैत्रिणी दिसल्या त्यांच्याशी परिचय करून देतांना माझ्या सासऱ्यांनी जावई म्हणून ओळख करून दिली ती त्याच्या चाली रीतीने 'माय डॉटरस मॅन'. शुद्ध मराठीत भाषांतर माझ्या मुलीचा माणूस. लगेच त्यांनी सुद्धा हस्तांदोलन करून नाईस टू मिट यु केले... मी खरंच लाजल्या सारखा झालो एकतर सर्व आदिमानावासारखे उभे असताना ह्यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकताना अजून दुसरे काय होणार?


तिसर्‍या मजल्यावर मोठा स्विमिंग पूल होता तेथे काही तरुण जोडपी एकत्र पोहत होती. आंम्ही मात्र न पोहता सरळ स्टीम बाथ घ्यायला गेलो. येथे आरामखुर्च्या टाकलेल्या होत्या व त्याला बुड टेकल्यावर वरती मिणमिणते लाईट लावून आकाशातील तारकांची कल्पना साकारली होती. वाफारा अंगावर घेत शांत पणे बसलो होतो. माझ्या बाजूला एक षोडषवर्षीय कन्या आई समवेत आली होती. भट्टी मध्ये तापलेल्या वातावरणात मनात कोणताही दुसरा विचार येणे शक्य नव्हते. मी तर खात्रीने सांगेन, कितीही चंचल व अस्थिर मनाचा माणूस असेल व ध्यान लावता येत नसेल त्याने सोना किंवा स्टीम घ्यावी. जेव्हा वाढत्या तापमानाबरोबर शरीराचे ७०% द्रव असलेला भाग आतल्या आत उकळू लागतो, हृदयाचे ठोके जोरात पळतात. रक्तदाब वाढतो तेव्हा चित्त वृत्ती आपसूक एका बिंदूपाशी येऊन थांबतात... पण जरा जरी अस्वस्थ वाटले तरी लगेच रुमच्या बाहेर पडणे असा इथे दंडक आहे. पण लहानपणापासून येणाऱ्या सराईत लोकांना ह्याचा त्रास होत नव्हता. माझा सासरा तर एकेकाळचा फुटबॉलपटू नि ट्रेनर, त्यामुळे भर पावसात ग्राउंड मध्ये निसरड्या मैदानात फुटबॉलचे सामने खेळणे म्हणजे स्टॅमिना हवा. तारांगण पाहत आम्ही तेथे स्वस्थ पणे पहुडलो होतो मग अजून काही लोक आली. त्यात त्यातील काही आपापसात चर्चा करत होते. फूटबॉल ची विश्वचषक स्पर्धा कतारला होणार. 'त्यांचाकडे कोणी फुट बॉल खेळतं तरी का?'. मी बोललो, "खेळत नसेल तरी त्यांच्याकडे पैसा आहे. फिफा ला एवढे सबळ कारण पुरते." ह्यावर आमचे मत जुळले मग त्या मुलीच्या आईने "तू कोणत्या देशातून आला आहेस?" वगैरे चौकशी केली. मग मी भारत म्हटल्यावर लगेच त्यांनी आम्ही गोव्याला जायचा बेत करत आहोत पुढच्या वर्षी असे सांगून टाकले. मी पुढील ५ मिनिटे गोव्याचा पर्यटन विभागाचा प्रतिनिधी असल्यासारखा त्यांना माहिती देत राहिलो . मग त्यांना आजचा दिवस चांगला जावो अशी सद्भावना व्यक्त करून मी त्यांचा निरोप घेतला.

 तळमजल्यावर मधोमध एक छोटेखानी मोकळे पटांगण होते. त्यावर आईस हॉकी च्या मैदानासारखा टणक बर्फाचा थर होता. बाजूला बसायला बाकडे होते ते हिमवर्षाव न्हाऊन निघाले होते. सर्व आदिमानव स्त्री पुरुष तिथे गोल गोल फेर्या मारता होते. माझा विश्वास बसत नाहि कि मी हिमवर्षाव अंगावर घेत उणे ३ तापमानात ह्या फेऱ्या मारल्या. आणि त्या बाकड्यावर काहीकाळ बसून संत्री सोलून खाल्ली ... पण त्या माजी खेळाडूंमुळे आपण कुठे कमी पडायचे नाही असा वज्र निर्धारच केला होता. फिटनेस ह्या लोकांचा पंचप्राण. एखाद्या गोष्टीचे वैज्ञानिक फायदे लक्षात आले, की ती गोष्ट आपल्या जीवनाचा एक भाग बनवायची, हा त्यांचा खाक्या. म्हणूनच योगा कधी त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनला हे आता त्यांनाच आठवत नाही. हजारो वर्ष आधी तन व मन ह्याचा विकास करणारी व सुदृढ जीवनशैली देणारी ही योगासने व संपूर्ण योगाभ्यास आपल्या संस्कृतीत होता. ह्यावरूनच त्यांना आपली संस्कृतीची महती कळून आली. येथे गल्लोगल्ली योगा क्लास आहेत. आम्ही शाखेत लहानपणी सूर्य नमस्कार घालायचो तेवढेच काय तो योगाभ्यास. येथे एक गोष्ट मी जी वेळोवेळी वाचली एकली त्याची अनुभूती आली, की अश्लील ही नग्नतेत नाही तर नजरेत त्याहून जास्त मानसिकतेत असते. 

येथे कितीतरी दांपत्य लहान मुलांना घेऊन आले होते. बालपणापासूनच ह्या वातावरणात वावरल्याने काही प्रमाणात त्याची व आदिवासी लोकांची नग्नते कडे पाहण्याचा दृष्टीकोन निकोप असतो हे वाचले पटले... अर्थात ह्याचा अर्थ त्यांच्याकडे सौंदर्यदृष्टी, रसिकता नसते अशातला भाग नाही. पण वखवख नसते. आपल्या कडे मात्र झाकण्याची प्रवृत्ति असल्याने त्याच्या पाठीमागे काय आहे ह्यातच कल्पनाशक्ती विकृत रूप घेते. उद्या माझा सासरा भारतात आला व सार्वजनिक सुलभ मध्ये गेला तर अनेक अनामिक पिकासो /रवी वर्मा ह्याचा कलाकृती दरवाजावर पाहून तो सर्दच होईल. अर्थात प्रचंड भौतिकता व अमर्याद व्यक्ती स्वातंत्र्य व आयुष्यात येणाऱ्या चढ उतरणा साथ सोबत करणारी कुटुंब व समाजव्यवस्था डबघाईला आल्याने येथे ड्रग व सेक्स ह्यांनी मुलांना अकाली जाणते केले आहे. माझ्या कितीतरी मैत्रिणी व मित्र बालपणीच्या आठवणी सांगताना त्यावेळी १४ ते १५ व्या वर्षी जरासे दमाने घेतले असते तर बालपण अजून काही काळ उपभोगता आले असते. अश्या वेळी मला जगजीतसिंहांचे वो कागज कि कश्ती आठवते. त्यांचे भाषांतर करून त्यांना सांगणे अशक्य होते कारण कवितेचा बाज अस्सल भारतीय होता. अर्थात परकीय फेअर लेडी अस्सल भातीय फुलराणी झाली. एवढी प्रतिभा माझ्यात नक्कीच नव्हती .  

२ टिप्पण्या :

  1. खूप मस्त लिहीतोस यार तू. वाचताना खूप मजा येते.

    उत्तर द्याहटवा
  2. शामिष
    तुमच्या विश्वासाला सार्थ ठरेल असे लिखाण करत करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
    पुन्हा आगत्याने येणे करावे .
    आपले सैदैव स्वागत होईल.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips