हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, ५ एप्रिल, २०१५

डोंबिवली , . भाग एक मेरा कूच सामान ...

.काल माझी वर्ग मैत्रीण अंजली ने  काय आप्पा वर

  आमच्या वर्गाच्या      समूहावर  वर झाडे लावण्या संबंधी  पोस्ट टाकली व माझ्या मनातील बालपणीच्या आठवणींचे वारुळ फुटले , तेच आता येथे रिते करतो.
मला माझ्या बालपणीचे डोंबिवली आठवले.
माझा आणि माझ्या आईचा जन्म डोंबिवलीचा
माझ्या आठवणीतील डोंबिवली म्हणजे वाड्यांचे शहर वजा गाव
म्हणजे त्याची धाटणी जरी शहराची असली तरी बाज गावाचा होता. डोंबिवलीकर हा कर्माने मुंबईकर तर मनाने पुणेकर असतो.  लोकलच्या गर्दीतून धक्के खात मुंबईला नोकरीस जाणारा व शुद्ध मराठीत बोलणारा डोंबिवलीकर हा डोंबिवली मध्ये वास्तव्यास आलेल्या दक्षिण भारतीय व इतर अमराठी भाषिक  लोकांच्या मुखातून सुद्धा शुद्ध मराठी विनासायास वदवून घेतो तेही कोणत्याही आंदोलनाशिवाय कारण मराठी संस्कृती परंपरा जपणाऱ्या मध्यमवर्ग डोंबिवलीची पर्यायाने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे   जुन्या डोंबिवली ५० ते ७० च्या काळात पूर्वेला वाडा संस्कृतीनं संपन्न झाली होती. टुमदार वाडे त्यात भाडेकरू पुढे मोठाले अंगण  व अंगणात विहीर तर वाड्याच्या मागे शौचालये व भरपूर झाडे झुडपे , तशी अंगणात सुद्धा मोठाले वृक्ष वल्ली असायचे वाड्यातील लोकांचे ह्या झाडांवर अतोनात जीव
डोंबिवली पूर्व ला वाडे संस्कृती जेव्हा ऐन बहरात होती तेव्हा
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी अशी अवस्था होती
गुलमोहर , आंबा  फणस नारळ प्राजक्ताची जास्वंदीची  झाडे
ह्याने डोंबिवली हिरवागार  होती , डोंबिवली पूर्वेच्या क म पा च्या मोठ्या वाचनालयाच्या बाजूला सध्या सुभाष डेअरी आहे तेथे पूर्वी असलेल्या मोठ्या वाड्यातील एका  बिऱ्हाडामध्ये    आईचा जन्म झाला ..त्याला लागून २ मिनिटावर आमच्या शाळेतील   शिधये बाईंचा वाडा आहे.
आता सगळ्या वाड्यांचे इमारतीत्च्या जंगलात रुपांतर झाले तरी त्यांचा वाडा आधुनिक साज चढवून आजही दिमाखात उभा आहे , पण का कुणास ठाऊक शाळेत मी त्यांना कधीही मी कुणाचा नातू आहे हे सांगितले नाही , आता वाटते सांगितले असते तर बरे झाले असते, माझे शाळेतील दिवस सुसह्य जाहले असते.    त्यांचे यजमान हे  माझ्या  मामांच्या पेक्ष्या वयाने मोठे असले तरी एकमेकांना ओळखतात


माझ्या लहानपणी वयाच्या ७ वर्षापर्यंत तो वाडा अस्तित्वात होता. पुढे वाडे पाडून  सोसायट्या उभ्या राहू लागल्या. तेव्हा सुद्धा प्रत्येक वाड्यातील    वाड्यातील माणसे बिल्डर लोकांना शक्य तेवढी झाडे न तोडता बिल्डिग बांधा अशी विनंती करत .प्रत्येक वेळी ते शक्य व्हायचे नाही त्यामुळे इमारत उभी राहतात अनेक वृक्ष पाडले जायचे त्याची भरपाई इमारत उभी राहिली कि पुढे नवीन जोमाने नवीन झाडे लावून केली जायची. आजही वाडा पाडून इमारती उभ्या राहिल्या तरी तेथील विहिरी बुजवल्या गेल्या नाही व घरकामाला  विहिरींचे पाणी बोअर बेल ने चढवून वापरले जाते , माझ्या मते पाणी टंचाई वर हा रामबाण उपाय आहे , डोंबिवलीतील प्रत्येक इमारतीच्या परिसरात एखादी विहीर बांधली तर पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटेल.

इमारती उभ्या राहिल्या तरी जुने वाडे करी डोंबिवलीकर एकमेकांशी जुने  ऋणानुबंध    टिकवून होते.
मी आई सोबत फडके रोड वरून घरी जातांना कधीही सलग घरी गेलो नाही आहे , दरवेळी आईला कोणीतरी परिचित किंवा तिच्या टिळक नगर शाळेतील मैत्रिणी किंवा माझ्या दोन मावश्या व दोन मामांचे वर्ग मित्र व मैत्रिणी भेटायचे ,  एकमेकांची गप्पा व्हायच्या ,गर्दी मध्ये उभे राहण्याची सोय नसायची तरीही पूर्वीचे डोंबिवली राहिले नाही असा तक्रारीचा सूर कधीही मी ऐकला नाही  .आता आईच्या परिचितांच्या सोबत एखादे प्रेक्षणीय स्थळ असले कि एकमेकांशी ओळख करून दिले जायची मग कोणत्या शाळेत कितवीत शिकतो हे सांगितल्यावर पुढे नकोसा वाटणारा प्रश्न विचारला जायचा
टक्के किती ... च्यायला अजून काहीतरी विचारांना
माझ्या आईच्या काळात   डोंबिवलीत टिळकनगर ही  एकच शाळा प्रसिद्ध होती व तेथेच माझ्या आईचे व मोठा मामा व मावशीचे शिक्षण झाले
पुढे स वा जोशी शाळा बांधली गेली व तेथे माझ्या छोट्या मामाचे व मावशीचे शिक्षण झाले , आता नियमितपणे टिळकनगरच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन भरतात माझी आई नियमितपणे त्यात भाग घेत ह्यावेळचे संमेलन पुण्यात झाले, सगळे आजी आजोबा झालेले हे माझी क्लास मेट्स अजूनही त्याच उत्साहात एकमेकांना भेटतात.




 आईचा एक मामा व दोन मावश्या व कितीतरी मावस भाऊ व बहिणी डोंबिवलीत राहायचे. त्यात भरीस भर वडिलाचे काका व मावशी डोंबिवली रहायची , वडिलांचे चुलत आजोबा व त्यांची मुले डोंबिवलीत राहायचे , देशस्थी परंपरेला साजेसे असे ह्या सगळ्यांशी आमचे ऋणानुबंध घट्ट होते , एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. डोंबिवलीच्या प्रत्येक भागांमध्ये माझा एकतरी नातेवाईक राहतो त्यामुळे डोंबिवलीच्या कोणत्याही गल्या व   रस्ते वाटा मला अनवट नाही.

पूर्वी ह्या सर्वांच्या वाड्यात गेलो की विहिरीत दगडे टाक, कासव पहा , आंबे व जांभळे पाडणे असे अनेक उपक्रम मी आनंदाने राबवायचो.
झाडावर चढून  मुलीना फुले. फळे शेवग्याच्या शेंगा तोडून देणे माझा डाव्या हातचा मळ होता. मी पूर्वी तिसरी पर्यंत डोंबिवली वेस्ट ला न्यू एवरेस्ट मध्ये राहायचो . तेथे झाडे लावण्याचा नतद्रष्टपणा कोणीही करायच्या भानगडीत पड्ले नव्हते तरीही ३ ते चार मोठी झाडे मात्र नक्की होती.
मात्र पूर्वेला मी नवीन घरी राहायला गेलो त्या ठिकाणी आधी जो वाडा होता तेथील मालकांनी  आग्रहाने झाडे न तोडण्याची अट बिल्डरला घातली होती , हा बिल्डर माझ्या आजोबांच्या ओळखीचा जुना डोंबिवलीकर व मध्यम वर्गातून वर आलेला इंजिनियर होता.
 एकेकाळच्या अ भ वि प कट्टर कार्यकर्ता असल्याने आपले ड्रीम प्रोजेक्ट आमची इमारत जी डोंबिवली मधील माझ्या माहितीतील सर्वात उत्कृष्ट  बांधकाम असलेली
बांधली तेव्हा त्याने अ भा वि प ला मोफत कार्यालय दिले. त्या काळात जमिनीच्या   एकेका इंचां साठी दिडक्या वाजवून घेणाऱ्या बिल्डर जमातीत तो सन्मानीय अपवाद होता.

   तेव्हा ह्या कार्यालयामुळे आमच्या  इमारती मधून  संध्याकाळी महाविद्यालयीन तरुण तरुणीच्या ताटव्यातून  वाट काढत आम्हास घरी जाण्यास मिळायचे , आमच्या उच्चभ्रू इमारतीत बहुतेक सर्व अभियंते व सी ए होते काही अनिवासी भारतीय तर काही कंपनीच्या उच्च पदावर कार्यरत होते ह्या इमारतीत सरकारी कर्मचारी आम्ही आणि वाडा मालक हि दोनच घरे होती अर्थात आजोबांच्या ओळखीने ह्या इमारतीत आम्हास घर मिळाले म्हणून आधीचे स्टेशन जवळील ५ मिनिटाच्या अंतराच्या जवळील घर सोडून आम्ही स्टेशन पासून जरासे लांब आलो.
 आमच्या इमारतीचे नाव सुद्धा तिच्या इभ्रतीला साजेसे नीशि डेल  अपार्टमेंट  असे होते , माझ्या सहावीत संपूर्ण इमारतीत केबल व त्या द्वारे  जागतीकारणाचा व परकीय संस्कृतीचा आमच्यात परकाया प्रवेश झाला. आजच्या घडीला माझ्या तत्कालीन मित्र मैत्रिणीतील सर्व एकजात अनिवासी असण्यामागे बहुदा ते एक कारण असावे..

    तेव्हा त्या भागात काही तुरळक इमारती होत्या व आजूबाजूला मोठाले वाडे होते व माझी लवकरच ह्या वाड्यातील मुला मुलींची गट्टी जमली ,
आमच्या बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर  वाशीच्या मोडेल कॉलेज चे प्रिन्सिपल राहायचे ते त्यांच्याकडे भौतिक शास्त्राची पी एच डी होती , ते नेहमीच मला इंग्रजीतून माझे मार्क विचारायचे व मी चाचरत हिंदीत उत्तर द्यायचो, बिल्डींग मध्ये बहुतेक अमराठी मारवाडी पंजाबी दक्षिण भारतीय ह्यांचा भरणा असल्याने राष्ट्र भाषेत आमच्या गप्पा चालत.
बिल्डींग मध्ये सुरवातीला डवरलेला गुलमोहर होता , पुढे नारळाचे मोठाले झाड होते , फणसांची दोन झाडे होती , बाकीची झाडे तोडल्या गेल्याने
वाड्यांचे मालक दुख्खी होते पण आम्हाला इमारतीच्या चारही बाजूला प्रशस्त अंगण होते व आमची इमारत हि मूळ रस्त्याच्या हून दीड ते दोन फुट उच्च होती , त्यामुळे तेथे नवीन झाडे लावण्याचे ठरले , आम्ही सर्व लहान मुले कौतुकाने  नवीन झाडे पावसाळ्याच्या आधी रोपवाटिके मधून नवीन झाडे आणायला गेलो त्याच्या आधी जमिनीत चर खणून खते टाकण्यात आली ,
 मला आठवते आम्ही मुलांनी एक घूस मरून  पडली होती तिला सुद्धा उचलून आणून जमिनीत पुरले व त्यावर पुढे प्राजक्ताचे झाड लावले.
आम्ही मुलांनी नुकताच इंग्रजी सिनेमा पहिला होता त्यात एक सायको व्यक्ती खून करून मृत देह जमिनीत पुरून त्यावर एक झाड बहुदा गुलाबाचे लावत असते.
व झाड डवरून येत असे.
त्यावरून आपण सुद्धा माणसाचे नाही तर प्राण्यांचे मृतदेह पुरून त्यावर झाड लावण्याची सुपीक सेंद्रिय योजना माझ्या मेंदूतून झिरपली व सुफळ संपन्न  जाहली,.   नारळाचे झाड लावण्या आधी जमिनीत खड्डा करून त्यात पोतभर  मीठ टाकण्यात आले , व त्यावर नारळाचे झाड लावण्यात आले , आमच्या शेजारच्या वाड्यातील कडू लिंबांचे झाड खूपच मोठे होते ,आमच्या बिल्डींग च्या भिंतीवरून मी त्यावर चढून चिमणीचे घरटे खाली आणले होते , हरभार्यांच्या शेंगांची विविध प्रकारच्या फुलांची झाडे लावण्यात आली. उन्हाळ्यात आम्ही कौतुकाने नळाला पाईप लावून किचन च्या खिडकीतून झाडांवर पाणी टाकायचो. प्रत्येकाचे आपल्या खिडकीतून दिसणाऱ्या झाडांच्या वर जीव होता.

आमच्या बिल्डींग मधील इंग्रजी  भाषिक उच्चभ्रूंची  भांडणे आजही आठवतात , प्रत्येकाला आपल्या कर्तुत्वाचा अभिमान एकमेकांना शिव्या सुध्धा इंगजी मधून देतांना पाहून माझा वडिलांना त्यांच्या बालपणीची मुंबईच्या त्यांच्या बटाट्याच्या चाळीतील खास भकार  युक्त अलंकारिक मायमराठीचा साज चढवलेली भांडणे आठवली नसती तरच नवल होते.  आमच्या शेजारी चितळे काकांचे लग्न मकरंद सोसायटी मधील सी ए असणाया काकुंशी ठरले तेव्हा त्यांच्या लग्नात मोहन वाघांच्या पासून अनेक मान्यवर मला पाहण्यास मिळाले ,
आता आमच्या बिल्डींग मधून सर्वच मुंबईत स्थलांतरित झाले , आम्ही सुद्धा , आमचे अजूनही घर तेथे शाबूत आहेत पण  आता इमारतीत मध्यमवर्गीय कुटुंबे आली , थोडक्यात
कॉन्व्हेंट शाळा आता  महानगरपालिकेच्या शाळेत रुपांतरीत झाली,

शेजारच्या वाड्यांच्या मध्ये
मराठमोळी मुलामुलींचा कंपू होता पुढे जशा जशा इमारतींचे इमले उभे ठाकले तेव्हा तेथे अजून नवीन सवंगडी त्या कंपूत जमा झाले व ह्या कंपूत माझा सुद्धा चंचू प्रवेश झाला.
मात्र माझ्या बिल्डीग मधील मित्र मैत्रिणी व ह्या कंपू मध्ये आज कोणाच्या मध्ये खेळायला जायचे ह्याची निवड करताना माझी त्रेधातिरपीट उडायची.

घरून माझ्या पाठी लागून मला नेहरू मैदानावर संघाच्या शाखेत पाठवणी व्हायची. पण माझे तेथे मन रमत नसे , मला मनसोक्त क्रिकेट लगोरी सारखे खेळ खेळून झाले की मग पाण्याच्या टाकी
वर सर्व मुल मुलींचा अड्डा जमायचं मग गप्पांना उधाण यायचे    खेळून झाले कि दिवे लागणीची वेळ झाली कि
अर्धा तास अ भा वि पा च्या कार्यालयात जाऊन बसायला आवडे , तेथे कॉलेजातील मुले मुली देशाचे राजकारण अर्थकारण समाजकारण आणि आपल्या सामाजिक बांधिलकी थोडक्यात त्यांच्या वयाच्या  व्यस्त असे अभ्यासाचे सोडून इतर सर्व गोष्टींच्या वर मनसोक्त चर्चा वाद विवाद  , करत .
 माझ्या बालपणी ह्या चर्चा त्यांच्या सामाजिक कार्यांचा फार मोठा पगडा होता , काही तरुण काही वर्ष ईशान्य भारतात जाऊन राहणार होते त्यासाठी निधी गोळा करायला मी सुद्धा त्यांच्या सोबत गेलो होतो , ह्या डोंबिवली शाखेतून पुढे अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेते झाले मला सर्व लहानपणापासून ओळखायचे.
माझ्या शालांत परीक्षेनंतर आम्ही डोंबिवलीत राहिलो असतो तर मी त्यांचा नक्कीच कट्टर कार्यकर्ता झालो असतो , आमच्या दहावी नंतर त्यांनी डोंबिवलीत टिळक नगर कॉलेजात
दोन दिवसाचे  व्यक्तिमत्त्व विकासाचे निवासी  शिबीर आयोजित केले होते.आमच्या शाळेतून मधुरा व सुवर्णा सुद्धा त्या शिबिरात आल्या होत्या पण आमच्या शाळेत मुले व मुली आठवी नंतर एकमेकांशी न बोलण्याची परंपरा होती तिला जागून मी त्या दोघींच्या समोर सुद्धा गेलो नाही पण त्या निमित्ताने  १०० ते २०० मुलांचे राहणे खाणे व वेगवेगळ्या विषयांच्या वर कार्यशाळा काटेकोर पद्धतीने पार पाडतांना पाहून   मी त्या कार्यकर्त्यांच्या नियोजन शैलीवर    प्रचंड भारावून गेलो होतो.
पुढे मुंबईत कॉलेजात गेल्यावर मात्र विज्ञात शाखेत प्रवेश घेतल्याने घरच्यांनी माझा दिन क्रम आखून दिल्याने तो निमूट पणे पाळणे माझ्या नशिबी आले.


कितीतरी जुन्या आठवणीचे धबधबे आज मनाच्या डोहात ओसंडून वाहत आहेत.
ह्या आठवणींच्या मध्ये कदाचित सुसूत्रता नसेल पण आजही डोंबिवलीत आमच्या बिल्डींग मध्ये आजूबाजूच्या परिसरात
माझ्या बालपणीच्या आठवणी रेंगाळत आहेत
मेरा कूच सामान ऐकायला घेतले आहे ,
अजून लिहिणे आता तरी शक्य नाही
पुढे जमेल तसे आठवणी लिहून काढेल
तूर्तास  रजा घेतो.

२ टिप्पण्या :

  1. आठवणी अशाच असतात रे! सुसूत्रता नसते त्यात पण तरी सुद्धा आपल्याला गुंतवण्याची ताकद असते त्यांच्यात. कधी कधी असं वाटतं की अरे, आत्ता तर आपण लहान होतो, इतके मोठे कधी झालो? मग तेव्हा मनमुराद जगलेले ते क्षण येतात कधीतरी आपल्याला पुन्हा त्या काळात घेऊन जाण्यासाठी.

    उत्तर द्याहटवा
  2. खरे आहे. मी तर माझ्या वर्तमान काळात मला पडलेल्या कुठल्याही प्रश्नावर उत्तर हे माझ्या भूतकाळात म्हणजे बालपणात शोधतो ,
    कारण आता मी अनेक मुखवटे व मानसिकतेचे पदर मनावर ओढून जगतो त्यामुळे बी युअर सेल्फ हा मंत्र पाळायचा असेल तर मी माझ्या लहानपणी अश्या प्रसंगात कसे वागलो असतो असा प्रश्न स्वतःलाच विचारतो. त्यामुळे बालपणाच्या डोहात डुंबायचे क्षण नेहमीच येत राहतात.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips