हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, २० जून, २०१२

मराठी संकेत स्थळावरील अनुभव व त्यांचा वास्तविक जीवनातील वास्तविक उपयोग

 मराठी संस्थळावर मुशाफिरगिरी करून ३ वर्ष झाली. सुरवातीला साता समुद्रापलीकडून मराठीत काही दर्जेदार वाचायला मिळावे ह्या हेतूने येथे माझा राबता सुरु झाला. सुरवातीला इतरांसारखा मी मूक वाचक होतो. हळू हळू प्रतिसाद द्यायला लागलो. व मग लेखनाला सुरूवात केली. माझे लेखन हे बहुदा एखाद्या विषयांवरील मनातील मुक्त प्रकटन असते किंवा गतकाळातील स्मृती परत जगण्यासाठी ,अनुभवले क्षण परत अनुभवण्यासाठी प्रवास वर्णन करणे इतपत मर्यादित असते.
 मात्र येथे मला आलेले अनेक चांगले वाईट ,आंबटगोड अनुभव दरवेळी काहीतरी नवीन शिकवून गेले. माझे वैचारिक ,भावनिक , सामाजिक , सांस्कृतिक विश्व समृद्ध करून गेले. आभासी जगतातील शिकवणीचा वास्तविक जगात कसा फायदा होतो ह्या बद्दल थोडे विनोदी अंगाने लेखन केले आहे. तेव्हा हलके घ्यावे ( टेकू इट इजि)
 मराठी संस्थळावर लिहीता झाल्याने माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप होकारात्मक बदल झाले. मला वाचनाचे व्यसन असल्याने जास्त वाचून व तू नळीवर पाहून मनातील भाव ,भावना ह्यांचा निचरा होण्यास आभासी जगतात अभिव्यक्त होणे हा रामबाण उपाय आहे. एखादे टोपण नाव घेउन समजा आपण एखादा विचार जो प्रत्यक्ष जीवनात मांडायला चाचरतो तो आभासी जगतात मांडला व त्याला काही समविचारी मंडळीचे अनुमोदन मिळाले की आपल्या विचार अगदीच फुटकळ नव्हता हा विचार एक आत्मविश्वास देऊन जातो.


 आपल्या समाजातील घटकांचे प्रतिबिंब तुम्हाला आभासी जगतात दिसते, तुम्ही ह्या जगात नवे असतात तेव्हा प्रस्थापितांचा किंवा समविचारी गटाचे ( ह्याला काही लोक कंपू म्हणतात ) प्राबल्य असते तेथे आपला निभाव कसा लावायचा.ह्याचे प्राथमिक शिक्षण मिळते. येथे आपल्या ऑफिसातील आपल्या कामावर वरिष्ठ मंडळाची मर्जी कशी सांभाळावी त्यांच्या हो मध्ये हो कसे मिसळावे. किंवा दोघांच्या वादात आपला फायदा कसा करून घ्यावा. किंवा योग्य त्या वेळी जुने स्कोअर कसे सेटल करावे. अश्या अनेक गोष्टी आपसूकच शिकायला मिळतात.
 कट्टा संस्कृती मुळे आपण प्रत्यक्ष जीवनात एकमेकांना भेटतो ह्या वैयक्तिक ओळखीच्या आपल्या खाजगी जीवनात उपयोग होतो. ह्या मागील भावना एकमेका साहाय्य करू ,अवघे धरू सुपंथ अशीच असते. उदा मला जर भारताबाहेरून भारतात शेअर बाजारात काही उलाढाल करायची असेल तर मी हक्काने रामदास ह्यांना व्यनी करू शकतो. उद्या कोणी मिपाकर  किंवा मुक्तपीठ अथवा मी मराठीवरील माझे सखे  सोबती  अथवा त्यांचे परिचित म्युनशन च्या जवळपास येणार असतील तर त्यांना काही माहिती ,सल्ला , देऊ शकतो .हेच जगभरात पसरलेल्या मिपा संप्रदायातील सर्वांना लागू पडते

. ह्या येथे घडणाऱ्या चर्चा मी वांझोट्या मनात नाही. विविध विषयाला वाहिलेले लेख किंवा चर्चा ह्यामुळे वास्तविक आयुष्यात मिपाकर कोणत्याही विषयावर हक्काने समूहात तोंड उघडू शकतो . येथे स्वतः ला कसे प्रेझेंट करावे किंवा स्वताच ब्यांड वल्यू कशी निर्माण ,विकसित व जपायची ह्यांचे शास्त्रशुद्ध धडे मिळतात ते आपल्या वास्तविक आयुष्यात उपयोगी पडतात.उगाच विजेता व्हा किंवा शिव खेरा ह्यांना पैसे का द्यावे?

 अजून महत्वाचे म्हणजे येथे वाचायला मिळणारे विनोदी लेखन ( ह्यात कोणी प्रयत्नपूर्वक विनोदी लिहितात तर कोणाचे लेखन आपसूक विनोदी ठरते ) ह्यामुळे दिलखुलास हास्याचे फवारे उडतात. आजच्या ताण तणावाच्या आयुष्यात हेच हास्य आपल्याला अनेक आजार व विकारांपासून लांब ठेवते. तुमच्यातील लखू रिसबूड येथेच विकसित होतो. मग तुमच्या कामावर तुमच्याविषयी मत बनते " ह्याला सगळ्यातील सगळे कळते" माझ्या बाबतीत म्हणाला तर येथे जीव गुंतल्या पासून पार्ट्या किंवा आयुष्यातील अनेक चैनीच्या व खर्चाच्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही व चित्त लाभत नाही. त्यामुळे वाचाल तर वाचाल व लिहाल ( अभिव्यक्त ) तर तणाव मुनसेक्त आयुष्य बहाल असा सुखी आयुष्याचा मूलमंत्र येथे सापडला

. येथे सध्याच्या आयुष्यात सर्वात मह्त्त्वाची व गरजेची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे मोफत आपली कातडी गेंड्याची करून मिळते. खऱ्या आयुष्यात कोणाशी वाद झाले व आपली बाजू कमकुवत पडत असेल तर मुद्दा भरकटत वळण्याची अमूल्य कला येथे शिकायला मिळते. कोणी पूर्वी आपल्यावर जाणून बुजून टीका केली किंवा आपल्याला टार्गेट केले तर वास्तविक व आभासी जगतात ते सुरवातीला सहन होत  पण सरावाने त्यांच्यात सुद्धा लज्जत घेण्यास सुरुवात होते. सध्या इतक्यात माझ्यावर किंवा माझ्या लेखनावर वैयक्तिक किंवा जनरल टीका झाली नाही आहे, पण जेव्हा ती होते तेव्हा मनातून गुदगुल्या होतात. आपल्यावर कोणी चार शब्द ,ओळी खर्च कराव्यात हेच काय आजच्या जगात कमी आहे. 

.( बदनामी होई पार नाम तो हुआ ह्या विचारसरणी असलेल्या प्रवृत्ती येथे व सार्वजनिक आयुष्यात सापडतात, त्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी म्हणेन जागती कारणात मराठी माणसं जगाच्या कानाकोपऱ्यातून एका आभासी व्यासपीठावर रोज जमतात. कोणी जहाल तर कोणी मवाळ तर कोणी तटस्थ तर कोणी न अध्यात ना मध्यात विविध विचारसरणीच्या माणसात सुखाने समाजात नांदायचे असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याहून वेगळा विचार करते म्हणून ती चूक कारण आपण कधीच चुकीचे वागत नसतो हा भ्रम दूर होण्यास आभासी जगता ची मोलाची मदत होते. आणि त्याचा वास्तविक आयुष्यात खूप वायदा होतो. आभासी जगतात आपण जसे वाद कसा करायचा हे शिकतो तसे तो कसा टाळायचा हे देखील शिकतो. मुळात आभासी जगतात वाद केलेला चालून जातो. वास्तविक आयुष्यात मात्र प्रत्येक वेळी तसे करून चालत नाही.

४ टिप्पण्या :

  1. मस्त लेख.. मुद्देसूद आणि सकारात्मक..
    अर्थात.. मराठी संकेत स्थळांवर वावरण्याचे काही तोटेही आहेत..
    त्याविषयीही लिहा कधीतरी...

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्याला शाळेत नेहमी निबंधाचा एक प्रकार असतो. विज्ञान शाप की वरदान ह्यात दोन्ही गोष्टींचा ऊहापोह करून त्याचा शेवट हि शक्ती दुधारी आहे. व ती चांगली का वाईट हे तिला कोण व कश्यासाठी वापरात आहे. ह्यावर अवलंबून असते. आज ह्या संकेतस्थळांच्या आभासी दुनियेत काही फायदे व तोटे नक्कीच आहे. पण त्यांचा जमाखर्च केल्यास तोट्यापेक्षा फायदे जास्त दिसून येतात.
    येथे मला आलेल्या वाईट अनुभवातून आपल्या वास्तविक आयुष्यात काय शिकण्यासारखे आहे. म्हणजे पुढच्यास ठेच ,मागचा शहाणा ह्या उक्ती नुसार मी हा लेख लिहीला. पियू परी तू म्हणते तसे ह्याचे तोटे दुर्लक्षित करून चालणार नाहीत. पण माझ्यामते सध्या आभासी जगतातील मराठी लेखकांना वाचक वर्ग निर्माण करणे व येथे ही विविध व्यवसायातील व्यक्ती आपले अनुभव ,विचार ह्यांनी युक्त असे दर्जेदार साहित्य निर्माण करते त्यांना आपल्या समाजात पुरेशी प्रसिद्धी मिळाली पाहिजे ह्या हेतूने मी लेखन केले.

    उत्तर द्याहटवा
  3. सर्व महत्वाचे म्हणजे, आंजा वर व्यक्ती समक्ष समोर नसल्यामुळे हावभाव आणि देहबोलीचा अभाव, त्यामुळे, आपण व्यक्त केलेले विचार पलीकडील व्यक्ती स्क्रीनसमोर बसून कसा अर्थ लावेल हे जराससं कठीण जातंय, कारण वाचणारा शब्द वाचतो पण स्वतःचे परिमाण लावून.!
    बाकी लहानपणापासून एक बाल-'कडू' मिळत असते कि हे जग म्हणजे एक मा.जा.(मायाजाल) आहे आणि ते अशाश्वत असते. त्यामुळे आपण नेहमीच्या जगात वावरतांना जी काही काळजी घेतो, तशीच ह्या आं.जा, वर पण घ्यावी, कारण शेवटी रस्त्यावर अपघात होतात म्हणून आपणा बाहेर पडायचे टाळत नाही, तर पुरेशी काळजी घेवून काम करायला निघतो.


    आणि ..
    पुन्हा एकदा... लिहिलंयस खूपच छान... लिहित राहा...

    उत्तर द्याहटवा
  4. पराग
    रस्यावर अपघात आणि गाडी चालविण्याचे उदाहरण जबरी
    मला जरासी सावधानी जिंदंगी भर आसनी ही दूरदर्शन वरील जाहिरात आठवली.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips