हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, १४ मे, २०१२

फेसाळणाऱ्या बिअरसाठी उसळणारा जनसागर (भाग २)

८) वाईन झेल्ट - या एकमेव तंबूत विविध प्रकारच्या वाईन आणि शँपेन मिळतात. सागरी, थाय खाद्यपदार्थ हे येथील प्रमुख आकर्षण. हा जागतिकीकरणाचा परिणाम, असा या तंबूसंदर्भात बायरिश लोक शेलका शेरा मारतात).

९) लोवेनब्राउ - तंबूच्या प्रवेशद्वाराजवळील १५ फूट उंचीची सिंहमूर्ती हे या तंबूचे आकर्षण. फुटबॉलपटूंचा हा आवडता तंबू).

१०) फिशर व्रोनी - नावातच सार्थकता असलेला मत्स्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरविणारा हा तंबू. माझा स्वतःच्या आवडीचा आहे. येथे आगुस्टेना बिअर मिळते).


आरक्षण नसले तरी तंबूबाहेर लोकांच्या लांबलचक रांगा असतात. एखादा तंबूतून लवकर बाहेर पडल्यास इतरांना त्यात प्रवेश मिळतो. मात्र प्रवेश मिळाला नाही तरी निराश व्हायचे काहीच कारण नाही. अनेक मंडळी तंबूबाहेर भरणाऱ्या विशाल जत्रेतमनसोक्त बागडतात. येथील बिअरमध्ये नेहमीच्या बिअरपेक्षा जास्त अल्कोहोल (५.८ ते ६.३ टक्के) असते. त्यामुळे मद्यपींसाठी खास १०० डॉक्टरांचा ताफा येथे सदैव सज्ज असतो. त्यांच्या मदतीला रेड क्रॉसच्या म्युनिक शाखेचे सहकारी आणि पोलिस असतात. २००८ च्या बव्हेरियन कायद्यांतर्गत तंबूमध्ये धुम्रपान निषिद्ध आहे. या मैदानावरून प्रशासनाला रोज एक हजार टन कचरा उचलावा लागतो. त्यांच्या या तत्परतेमुळे मैदान नेहमीच स्वच्छ असते.
  तंबू  च्या  आता शिरल्यावर  आतला माहोल आणि मौसम  पाहून ह्या पद्याची आठवण झाली.
 आम्ही सायंकाळी हॉफ ब्राउ बिअर टेंटमध्ये गेलो होतो. मंद संगीताच्या तालावर आठ हजार लोक डोलत होते. पर्यटकांमधील एकट्या मुलींना, विशेतः मुलींना ड्रिंक ऑफर करण्यात येत होती. शेवटच्या एका तासात तर अनेक झिंगलेल्या तरुणी आणि त्यांच्या अवतीभवती रुंजी घालणारे तरुण दिसत होते. त्यापैकी बहुतेक इटालियन आणि त्यांच्या सार्वजनिक प्रणय चेष्टा हा उबग आणणारा प्रकारही निदर्शनास आला. पूर्णपणे संतुलन गमावलेल्या व मर्यादेबाहेर पुंडाई करणाऱ्या लोकांना, सहा फुटांपेक्षा उंच असलेले सुरक्षारक्षक बाहेर नेत होते. ठीकठीकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख होती.
चायनीज आणि मेक्सिकन कलीग सोबत सुरापान करतांना
'आमच्यावेळी असे नव्हते', शेजारच्या टेबलावरील एक वयस्कर जोडपे बोलले. आता संगीत शिगेला पोचले आहे. तरुणाई टेबलावर उभी राहून नाचत होती आणि मध्येच खाली पडत होते. गर्दीचा फायदा घेऊन अंगचटीला येण्याचे प्रकार सर्रास चालले होते. अशा वेळी जडावलेल्या डोळ्यांनी ते जोडपे आम्हास सांगू लागले, ''गेल्या दहा वर्षांत या फेस्टचे रुपडे अंतर्बाह्य बदलून गेले आहे.'' पायघोळ झग्याऐवजी आता तंग आणि आखूड झगे घालून अनेक विदेशी आणि स्थानिक मुली मिरवू लागल्या आहेत. पारंपरिक बायरिश वाद्यवृंदांची जागा आता अमेरिकी पॉप आणि हिप हॉप गाण्यांनी घेतली आहे.
टेबलावर नाचणे हा निव्वळ उथळपणा. आता हे झिंगलेले पर्यटक रात्री बागा किंवा रस्त्यांवर मिळेल तिथे धिंगाणा घालतील. पोलिस तरी त्यांना किती आवरणार? अनेक पर्यटक येथे फक्त बिअर पिणे व सेक्ससाठी येतात. आमची तरुणाई देखिल त्याच मार्गाला लागली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 या फेस्टमधून आमची संस्कृती, खाणे-पिणे याच्याशी बहुतेक पर्यटकांना काहीच देणे घेणे नसते. २००१ मध्ये साडेसहा युरोला मिळणारा एक मास आता साडेनऊ युरोला मिळतो. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. प्रचंड गर्दीचा ताण संपूर्ण म्युनिकवर असतो. पर्यटक अगदी बेतालपणे वागतात. यामुळे अनेक स्थानिक लोक चक्क फेस्टिव्हलपासून लांब राहणे पसंत करतात. रात्री परत येताना रस्त्यावर लोकांची गर्दी ओसंडून वाहत होती. अनेक लोक रस्त्यावर जास्तीची झालेली बिअर भूमातेला अर्पण करत होते. काही तासापूर्वी एकमेकांना अनोळखी असणारी अनेक युगुले, एका रात्रीच्या संगतीसाठी निवारा शोधत होती. या फेस्टिव्हलला शक्यतो महिलांनी मोठ्या व ओळखीच्या ग्रुपसह गेल्यास त्यांना त्रास होत नाही, असे आढळून आले.
 बाहेर भव्य विजेचे पाळणे आणि अनेक क्रीडा प्रकार होते . खाण्याचे अनेक ठेले लागले होते. एकंदरीत माहोल  सगळा आपल्या महालक्ष्मी च्या किंवा माउंट मेरीच्या जत्रेसारखा असतो. मात्र सर्व भव्य प्रमाणात अत्यंत योजनाबध्ध व शिस्तबध्द रीतीने हा सोहळा दरवर्षी घडवून आणणाऱ्या जर्मन सरकार व जनतेचे कौतुक वाटले. आपल्या अनेक स्वातंत्र्य वीरांना असाच शिस्तप्रिय समाज अपेक्षित होता.
दोन आठवडे जीवाचे म्युनिक करून घेतले. आता वेध लागले आहेत ते पुढच्या वर्षीच्या सोहळ्याचे कारण तेव्हा मी काही पहिलटकर नसणार आणि सर्व तयारीने म्हणजे तब्बल सहा महिने आधी ऑन लाईन  तंबू मधील मोक्याच्या जागा आरक्षित करणार आहे. आपली अस्मिता ,परंपरा , रूढी , प्रथा जपणाऱ्या ह्या बायरिश लोकांच्या म्युनिक शहराचे वर्णन वेळ मिळताच सचित्र करेल.

२ टिप्पण्या :

 1. निनाद, तू लिहीतच जावे, आणि आम्ही वाचतच रहावे...खुप सुंदर लेखन. आणि मध्येच काही boundries ज्या tolavalya आहेत त्या वाखाणण्या लायक.

  आणि
  आमच्यापुरते म्हणाल तर,
  ...
  ...
  अस्मादिकांचा आवडता आहे हिप्पोड्रोम|
  त्यात जागा नक्की मिळवावी|
  परी तल्लफ रमवावी ऑगस्टीनरशीच|
  नाहीतर खुश्शाल परतावे तहानलेशी||
  -इति पराग.

  उत्तर द्याहटवा
 2. पराग जी
  खरे तर हे एखाद्याच्या नावापुढे जी लावणे म्हणजे त्या व्यक्तीस पार्ले जी च्या रांगेत बसविल्या सारखे वाटते.
  तेव्हा हक्कने पराग म्हणतो.
  माझ्या लेखाचे सार तू चार ओळीत मांडले.
  अशी प्रतिभा मज ठायी असती तर एवढी शब्दाची गर्दी व खिचडी मी केली नसती.
  पण तंबुंत प्रवेश मिळाला नाही म्हणून अगदीच निराश होण्याचे कारण नाही. बियर गार्डन नावाचा भन्नाट प्रकार येथे बायर्न मध्ये अस्तित्वात आहे. तो येथे तंबू बाहेर तात्पुरता उभारला असतो.तेथे आपली तहान भागवली जाऊ शकते.
  ह्या बियर गार्डन बद्दल तपशीलवारपणे म्युनिक शहराबद्दल जेव्हा लेख लिहू. तेव्हा तपशीलवार पणे मांडू.

  उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips